बदललेली जीवनशैली, रसायनयुक्त दैनंदिन आहार, तणावपूर्ण धकाधकीचे जीवन, रस्ते अपघातांचे वाढलेले प्रमाण यांसारख्या विविध कारणांमुळे कोण केव्हा आजारी पडेल? व कोणाला केव्हा दवाखान्यात भरती करावी लागेल? हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. घरातील लहान मुलेही डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांना बळी पडत असल्याचे दिसून येते. घरातील कोणत्याही व्यक्तीला दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली तरी आपले आर्थिक स्थैर्य व मानसिक शांती भंग होण्यास पुरेसे कारण ठरते. बरेचदा स्वतःचे घर, मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी पै पै जमा करून केलेली दीर्घकालीन गुंतवणूकही वैद्यकीय उपचारासाठी खर्च होऊन जाते. आपल्या प्रियजनांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी वेळप्रसंगी कर्जबाजारी होण्याचीही वेळ येते. या सर्व बाबीवरील उपाय व आपले आर्थिक स्थैर्य तसेच मानसिक स्वास्थ्य बिघडू न देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हेल्थ इन्शुरन्स होय. चला तर मग आज आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया, प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? याची महत्त्वाची 10 कारणे….
हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? महत्त्वाची 10 कारणे
महागड्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षण
आज घडीला वैद्यकीय उपचारावरील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच दरवर्षी वैद्यकीय उपचारावरील खर्च वाढतच जाणार आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीला एकदाही दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली तरी आपले आर्थिक नियोजन पूर्णतः बिघडून जाते. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे विविध उपचार नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जातात. यामुळे रुग्णाला लवकर फायदा होतो परंतु अशा उपचारांचा खर्च करण्यात बरेचदा आपली दीर्घकालीन गुंतवणूकही संपून जाते. काही लोकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असल्यास महागड्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चापासून संरक्षण मिळते. हेल्थ इन्शुरन्समुळे वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचा बोजा तुमच्यावर पडत नाही. यावरून, प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? याची थोडक्यात कल्पना आली असेलच.
दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता
तुमच्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स असल्यास तुम्हाला दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या दवाखान्यात उपचार घेता येतात. हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास कॅशलेस सुविधा उपलब्ध असते तर इतर दवाखान्यात उपचार घेतल्यास वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची भरपाई कंपनीकडून दिली जाते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी पैशाअभावी रुग्णाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्ण बरा होण्यास बराच अवधी लागतो. हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाला दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळण्याची हमी देते.
मानसिक शांतता
हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक शांतता प्रदान करते. कारण हेल्थ इन्शुरन्समुळे आपत्कालीन वैद्यकीय संकट किंवा आजारपण आले तर तुमच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही याची तुम्हाला खात्री असते. हेल्थ इन्शुरन्समुळे तुम्हाला किंवा रुग्णाला वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची चिंता राहत नसल्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मानसिक धैर्य मिळते. म्हणून प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? याचे चिंतन केले पाहिजे.
दीर्घकालीन आर्थिक नियोजन
ज्याप्रमाणे स्वतःचे घर, मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या भविष्यकालीन आवश्यक गरजांसाठी आपण कमावलेल्या पैशातून काही रकमेची नियमित गुंतवणूक करत असतो. नियमित गुंतवणूक न केल्यास भविष्यातील प्रत्येक आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे उर्वरित संपूर्ण जीवन कर्जाचे हप्ते भरण्यातच निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी घेतलेला हेल्थ इन्शुरन्स हा निव्वळ खर्च नसून आपल्या आरोग्यावर केलेली एक छोटीशी गुंतवणूकच आहे. होय, छोटीशी गुंतवणूक. कारण दरमहा 800 ते 1500 रुपयामध्ये आपल्या कुटुंबासाठी एक चांगला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध आहे. हेल्थ इन्शुरन्सवरील ही छोटीशी गुंतवणूक तुमचे वैद्यकीय उपचारावरील लाखो रुपये तर वाचवतेच, शिवाय तुमची दीर्घकालीन गुंतवणूकही सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
अत्यंत कमी प्रीमियम
हॉस्पिटलचे लाखो रुपयाचे बिल वाचवण्यासाठी दरमहा केवळ 800 ते 1500 रुपयेपर्यंतचे प्रीमियम देऊन घेता येणारा हेल्थ इन्शुरन्स पुरेसा आहे. 10 लाख रुपये हेल्थ कव्हर असलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनसाठी वार्षिक 10000 ते 18000 रुपये पर्यंत प्रीमियम द्यावा लागतो. या प्लॅनसह सुपर टॉप अप इन्शुरन्स प्लॅन घेतल्यास एक हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रीमियम देऊन हेल्थ इन्शुरन्सचे कव्हर एक करोड रुपये पर्यंत सुद्धा वाढवता येते.
हेही वाचा : टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?
प्रतिक्षा कालावधीचा लाभ
कमी वयात हेल्थ इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरते. कारण बऱ्याच हेल्थ इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला पूर्वीपासून असलेल्या आजारासाठी हेल्थ इन्शुरन्स कव्हर लगेच देत नाही. काही विशिष्ट आजारांसाठी दोन वर्षापर्यंतचा प्रतिक्षा कालावधी असतो, म्हणजे या दोन वर्षादरम्यान तुम्हाला विमा कंपनीच्या यादीमधील विशिष्ट आजार झाल्यास या आजारावरील खर्चाची भरपाई हेल्थ इन्शुरन्स कंपन्या देत नाही. जसे बीपी, शुगर, अस्थमा यासारख्या पूर्वीपासून असलेल्या आजारावरील खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपन्या तीन ते चार वर्षानंतर करत असतात. त्याचप्रमाणे मोतीबिंदूसारख्या आजारावरील खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपनी पॉलिसीच्या तिसऱ्या वर्षापासून करत असतात. यालाच विशिष्ट आजारांसाठी असलेला प्रतिक्षा कालावधी असे म्हणतात. प्रत्येक विमा कंपनीच्या बाबतीत हा प्रतीक्षा कालावधी वेगवेगळा असू शकतो. काही कंपन्या प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रीमियम आकारतात. म्हणून कमी वयात तंदुरुस्त असताना हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास प्रतिक्षा कालावधीचा लाभही मिळतो.
वयानुसार वाढत्या आरोग्य समस्या
जसजसे वय वाढत जाईल तस तशा आरोग्य समस्या सुद्धा वाढत जाणार आहेच. जास्त वयाबरोबरच आरोग्य विषयक समस्या जसे बीपी, शुगर, अस्थमा असेल तर त्यावेळी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम खूपच जास्त असणार आहे. म्हणूनच वाढत्या वयाबरोबरच आरोग्य विषयक समस्या वाढत जाणार आहे, हे गृहीत धरून प्रत्येकाने तरुण वयात आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.
आजारपणापूर्वी व नंतरचे लाभ
वैद्यकीय उपचाराचा खर्च दवाखान्यात भरती असलेल्या कालावधीपर्यंतच मर्यादित राहत नाही, तर आजारी पडण्यापूर्वी आजाराचे निदान लागण्यासाठी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या, एक्स-रे, MRI, औषधे डॉक्टरांचा सल्ला इथपासून सुरू झालेला वैद्यकीय उपचाराचा खर्च दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतरही डॉक्टरांच्या भेटी, औषधे, तपासत्या इत्यादी माध्यमातून सुरूच राहतो. हेल्थ इन्शुरन्समुळे दवाखान्यात भरती करण्यापूर्वीचे 60 दिवस व सुट्टी मिळाल्यानंतरचे 180 दिवसापर्यंतचा सर्व खर्च विमा कंपन्याद्वारे केला जातो. या खर्चामध्ये वैद्यकीय तपासण्या, MRI, सिटीस्कॅन, डॉक्टरची फी, फिजिओथेरपी, औषधे व इतर खर्चाचा समावेश होतो. त्यामुळे हॉस्पिटलचे लाखो रुपयाचे बिल वाचवण्यासाठी मासिक 800 ते 1500 रुपये आरोग्यावरील गुंतवणूक म्हणून प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स घेतलाच पाहिजे.
सरकारी आरोग्य विमा पुरेसा नसणे
आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या शासकीय आरोग्य विमा योजनेमध्ये प्रत्येक आजारानुसार खर्चाचे प्रमाण मर्यादित असते. शिवाय हेल्थ इन्शुरन्स प्रमाणे दवाखान्यात भरती होण्यापूर्वीच्या 60 दिवसाच्या व सुट्टी नंतरच्या 180 दिवसापर्यंतच्या खर्चाच्या भरपाईची कोणतीही तरतूद नसते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक असायलाच पाहिजे.
विविध सुविधांची उपलब्धता
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस, हेल्थ चेकअप, वेलनेस बेनिफिट, अनलिमिटेड टेलीकन्सल्टेशन, अनलिमिटेड ऑटोमॅटिक रिचार्ज, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, नो को-पेमेंट, आयुष ट्रीटमेंट, डे केअर ट्रीटमेंट, प्री – पोस्ट हॉस्पिटलायझेशन यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे.
सारांश
हेल्थ इन्शुरन्स हा खर्च नसून आरोग्यावर केलेली गुंतवणूक तर आहेच परंतु एक प्रकारे आपली दीर्घकालीन गुंतवणुक सुरक्षित राहावी म्हणून आपल्या गुंतवणुकीचा सुद्धा विमा आहे असे म्हणायला हरकत नाही. हेल्थ इन्शुरन्स आपल्याला आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. हेल्थ इन्शुरन्समुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे खर्च अत्यंत कमी दरात करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मासिक 800 ते 1500 रुपयासाठी आपली आयुष्यभराची कमाई किंवा उर्वरित आयुष्य नेहमी करता आर्थिक जोखमीवर ठेवणे कुणालाही परवडणारे नाही म्हणून सर्वांना हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप नंबर वर संपर्क साधू शकता.
FAQ
आम्हाला विम्याची गरज का आहे?
होय, आरोग्य विमा सर्वांना अत्यावश्यक आहे. कोणतेही आजारपण गरीब- श्रीमंत असा भेद करत नाही.
विम्याचा उद्देश काय आहे?
आरोग्य विषयक संकटात आर्थिक संरक्षण, दर्जेदार व अत्याधुनिक सुविधायुक्त उपचार
विमा धोका कसा कमी करतो?
आरोग्य विमा घेतल्याने आजारापासून संरक्षण मिळत नसून त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटातून सुरक्षित राहता येते.
प्रीमियम म्हणजे काय?
आरोग्य विम्यापोटी भरलेली रक्कम म्हणजेच प्रीमिअम होय.
आरोग्य विम्यामध्ये दंत उपचारांचा समावेश होतो का?
प्रत्येक विमा कंपनीनुसार वेगवेगळी अट असते.