How To Buy Term Insurance in 2024 | टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?

जीवन हे अनिश्चिततेने भरलेले आहे. आजची बदलती जीवनशैली व ताणतणाव यामुळे जडणाऱ्या विविध आजारांमुळे उदा. हार्ट अटॅक, बीपी तसेच अपघातांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे आपल्या परिचयातील / परिसरातील एकुलती एक कमावती व्यक्ती आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या जसे – घर, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादी पार पाडण्याआधीच कमी वयात मृत्यू पावल्याचे आपल्याला माहीत असेलच. अशा घटनेनंतर त्या कुटुंबाला बसणारा धक्का सहन न होणारा असतो. असे कुटुंब आजपर्यंत ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच पद्धतीने भविष्यात सहजतेने जीवन जगायला मिळेल याची कोणतीही शाश्वती नसते. असे कुटुंब जर कर्जाच्या विळख्यात असेल तर त्या कुटुंबाची अवस्था दयनीय होऊन जाते. अशी घटना सर्वांसोबत होईलच याची जरी खात्री नसली तरी शक्यता मात्र नाकारता येत नाही. म्हणूनच आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे ही सुद्धा आपली एक महत्त्वाची कौटुंबिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पार पाडू शकतो एका छोट्याशा गुंतवणुकीतून, ती म्हणजेच टर्म इन्शुरन्स – मुदत विमा. या लेखामध्ये टर्म इन्शुरन्स विषयी सर्वसमावेशक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लेखाचे वाचन केल्यानंतर टर्म इन्शुरन्स विषयी आपल्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील अशी आम्हाला आशा आहे. चला तर मग जाणून घेऊया टर्म इन्शुरन्स विषयी…

अनुक्रमणिका

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? What is Term Insurance

What is Term Insurance

टर्म इन्शुरन्स हा जीवन विम्याचा एक असा प्रकार आहे जो तुम्ही निश्चित केलेल्या ठराविक कालावधीपर्यंत तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करतो. टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला विशिष्ट कालावधीपर्यंत एक निश्चित रक्कम – प्रीमियम भरून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित असल्याची खात्री करण्याचा एक सोपा व परवडणारा मार्ग आहे. टर्म इन्शुरन्स पॉलिसी दीर्घकालीन संरक्षण, कमी प्रीमियम दरात उच्च कव्हर आणि आयकर लाभ यासारखे अनेक फायदे देखील देते. टर्म इन्शुरन्स घेण्याचा पॉलिसी धारकाचा उद्देश म्हणजेच कुटुंबाला मृत्यू लाभ मिळवून देणे होय. टर्म इन्शुरन्स घेताना तुम्ही एक कव्हर रक्कम उदा. एक करोड आणि पॉलिसी कालावधी उदा. वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यांची निवड करता. या कालावधी दरम्यान एक विशिष्ट रक्कम म्हणजेच प्रीमियम भरून पॉलिसी सुरू ठेवता येते. पॉलिसी कालावधीमध्ये तुमचा मृत्यू झाल्यास पॉलिसीची संपूर्ण कव्हर रक्कम ( Sum Assuared ) तुमच्या वारसदारांना दिली जाते. परंतु संपूर्ण पॉलिसी कालावधी पर्यंत तुम्ही जिवंत राहिला तर पॉलिसी बंद होते व तुम्हाला कोणतीही रक्कम मिळत नाही. टर्म इन्शुरन्सच्या काही पॉलिसी प्रकारामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण रक्कम पॉलिसी कालावधीनंतर परत मिळण्याची सुविधा आहे, ते आपण पुढे पाहूच. टर्म इन्शुरन्स प्रीमियम एकदा पॉलिसी घेतल्यानंतर पूर्ण पॉलिसी कालावधीसाठी कायम राहतो. मात्र पॉलिसी कमी वयात घेतल्यास प्रीमियम कमी द्यावा लागतो तर पॉलिसी घेताना वय जास्त असल्यास प्रीमियम जास्त द्यावा लागतो.

टर्म इन्शुरन्स चे फायदे

Benefits of Term Insurance

टर्म इन्शुरन्सचे काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

परवडणारा विमा

टर्म इन्शुरन्स चे लाभ पाहता जीवन विमा किंवा इतर गॅरेंटेड इन्कम प्लॅनमध्ये मिळणाऱ्या कव्हरच्या तुलनेत टर्म इन्शुरन्स हा खूप परवडणारा प्लॅन आहे. टर्म इन्शुरन्समध्ये कमीत कमी दरात उच्च आर्थिक सुरक्षा कवच मिळते. यामुळे कमी बजेट असलेल्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात.

लवचिकता

टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसीचा कालावधी व कव्हर रक्कम निवडताना लवचिकता असते. तुम्ही तुमच्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टे समोर ठेवून तुमच्या पॉलिसीचा कालावधी व कव्हर रक्कम ठरवू शकता. उदा. तुमच्या तुम्हाला तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुमची मुले स्वतःच्या पायावर उभी होईपर्यंतची पॉलिसी कालावधी निवडावा लागेल. हा कालावधी 20, 25 किंवा 30 वर्षे व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो.

आयकर सूट

टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियमची भरलेली सर्व रक्कम जुन्या आयकरपद्धतीमध्ये कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयेच्या मर्यादेत करमुक्त असते. तसेच जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेताना क्रिटिकल इलनेस बेनिफिट हा पर्याय निवडला असेल तर याअंतर्गत भरलेले प्रीमियम कलम 80 डी नुसार करमुक्त असते. टर्म इन्शुरन्सचे मृत्यू लाभ डेथ बेनिफिट हे कलम 10(10) डी नुसार आयकर मुक्त आहे. क्रिटिकल इलनेस बेनिफिट अंतर्गत मिळालेले लाभ सुद्धा कलम 10(10) डी नुसार करमुक्त आहे.

TERM INSURANCE

टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?

टर्म इन्शुरन्स विकत घेताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

रोख मूल्य – कव्हर अमाऊंट (Sum Assuared)

टर्म इन्शुरन्ससाठी कव्हरेज रक्कम काळजीपूर्वक निवडावी. तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, तुमची चालू असलेली कर्जे, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च इत्यादी सारख्या सर्व बाबींचा विचार करून तुमच्या पश्चात पुढील किमान 10 ते 15 वर्षे तुमचे कुटुंब स्थिर होईपर्यंत आवश्यक असलेले कव्हरेज रक्कम टर्म इन्शुरन्स घेताना निवडावा. कव्हरेज निवडताना महागाईच्या दराचा म्हणजेच इन्फेक्शनचा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. साधारणतः तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 12 पट कव्हरेज रकमेचा टर्म इन्शुरन्स उत्तम मानला जातो.

पॉलिसी कालावधी ( Policy Term )

टर्म इन्शुरन्स घेताना योग्य टर्म कालावधी निवडणे खूप आवश्यक आहे. तुमच्या घरचे लोक सध्या त्यांच्या जीवनाच्या कोणत्या स्तरावर आहेत तसेच भविष्यकालीन आर्थिक उद्दिष्टे विचारात घेऊन टर्म इन्शुरन्सचा कालावधी ठरवा. सहसा तुमची मुले आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंतच्या कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स घ्यावा. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाचे हाल होऊ नये यासाठी साधारणतः तुमच्या वयाच्या 65 वर्षापर्यंतचा टर्म इन्शुरन्स घेणे उत्तम मानले जाते. कारण यानंतर तुमची मुले आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेली असतात. पॉलिसीचा कालावधी, पॉलिसी घेताना निवडला की पुन्हा बदलता येत नाही.

लाईफस्टेज बेनिफिट कव्हरेज (Life Stage Benefit )

काही विमा कंपन्या तुमच्या जीवनातील विशिष्ट प्रसंगाच्या वेळी तुमचे इन्शुरन्स कव्हर वाढवण्याची सुविधा देतात. जसे की, पॉलिसी धारकाचे लग्न, पहिले बाळ व दुसरे बाळ जन्मल्यानंतर अतिरिक्त रक्कम भरून या सुविधेचा लाभ घेता येतो. जरी आज एक करोड ही रक्कम खूप मोठी वाटत असली तरी 10 – 20 वर्षानंतर एक करोडचे मूल्य निश्चितच आजच्या तुलनेत कमी होणार आहे. म्हणूनच वाढत्या जबाबदारीनुसार तुम्ही तुमचे इन्शुरन्स कव्हर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकता.

ॲड ऑन रायडर्स ( Add On Riders )

टर्म इन्शुरन्सचा मुख्य लाभ म्हणजे मृत्यूलाभ – डेथ बेनिफिट होय. यासोबतच विमा कंपन्या इतर लाभ देत असतात. अतिरिक्त प्रीमियम भरून हे लाभ घेता येतात.

या सुविधांना ॲड ऑन रायडर्स म्हटले जाते. ॲड ऑन रायडर्स घेणे ऐच्छिक असते. टर्म इन्शुरन्ससोबत दिले जाणारे ॲड ऑन रायडर्स पुढीलप्रमाणे आहेत.

अपघाती मृत्यूलाभ ( Accidental Death Benefit)

यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास निश्चित केलेली रक्कम अपघाती मृत्यू लाभ म्हणून मिळते. या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेसोबतच टर्म इन्शुरन्सचे मूळ लाभ सुद्धा वारसदारांना मिळते. टर्म इन्शुरन्स घेताना 50 लाख रकमेचा एक्सीडेंटल डेथ बेनिफिट रायडर घेतलेला असेल तर अपघाती मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्सच्या डेथ बेनिफिट सोबतच एक्सीडेंटल डेथ बेनिफिट 50 लाख रुपये अतिरिक्त मिळतात. अपघाती मृत्यू लाभाच्या रकमेनुसार प्रिमिअम द्यावा लागतो.

क्रिटिकल इलनेस बेनिफिट ( Critical Illness Benefit)

यामध्ये जर पॉलिसी धारकाला विमा कंपनीच्या यादीमध्ये समाविष्ट आजारापैकी कोणत्याही आजाराचे निदान झाले तर निश्चित केलेले क्रिटिकल इलनेस लाभाची रक्कम देण्यात येते. याचा लाभ मिळण्यासाठी कोणतेही उपचार घेतले असल्याची किंवा मेडिकल बिलांची आवश्यकता नाही. या आजाराच्या उपचारासाठी पॉलिसी धारकाला जरी कमी खर्च येत असला तरी पॉलिसी घेताना निश्चित केलेली क्रिटिकल इलनेस लाभाची संपूर्ण रक्कम पॉलिसी धारकाला आजाराचे पहिल्यांदा निदान झाल्याबरोबर मिळते. वेगवेगळ्या विमा कंपन्याच्या यादीमध्ये वेगवेगळ्या आजारांचा समावेश असू शकतो. त्यामुळे पॉलिसी घेताना सर्व बाबी पडताळून पाहणे आवश्यक आहे.

टर्मिनल इलनेस बेनिफिट ( Terminal Illness Benefit)

यामध्ये जर पॉलिसी धारकाला विमा कंपनीच्या यादीमध्ये समाविष्ट टर्मिनल इलनेस पैकी कोणत्याही आजाराचे निदान झाले तरी टर्म इन्शुरन्स ची संपूर्ण रक्कम दावाकर्त्याला देण्यात येते टर्मिनल इलनेसमध्ये अशा आजारांचा समावेश होतो ज्यामध्ये व्यक्ती फक्त काही दिवसच जिवंत राहू शकते. काही विमा कंपन्यातर्फे हा लाभ अतिरिक्त प्रीमियम न घेता देण्यात येतो.

वेव्हर ऑफ प्रिमिअम बेनिफिट (Waiver of Premium Benefit )

यामध्ये पॉलिसी धारकाला अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास पुढचे सर्व प्रीमियम कंपनीकडून माफ केले जाते. पॉलिसीचे कव्हर सुरुवातीला घेतलेल्या कालावधीपर्यंत सुरूच राहते. कायमच्या अपंगत्वामुळे पॉलिसीधारक कोणतेही काम करण्यास सक्षम नसेल तर अशा परिस्थितीत कंपनीकडून या सुविधेचा लाभ देण्यात येतो.

लाभानुसार टर्म इन्शुरन्स चे प्रकार

Types of Term Insurance

टर्म इन्शुरन्समध्ये मिळणाऱ्या लाभानुसार तीन प्रकार पडतात

रेगुलर टर्म इन्शुरन्स

एखादी व्यक्ती टर्म इन्शुरन्स घेताना ठराविक कालावधी व कव्हरेज रकमेची निवड करून त्याला परवडेल अशा प्रीमियमनुसार पॉलिसीची निवड करतो. या प्रकारच्या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरू असताना पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसांना मृत्यू लाभ म्हणजेच पॉलिसीची कव्हर रक्कम देण्यात येते. परंतु पॉलिसीच्या अंतिम कालावधीपर्यंत पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास कोणतीही रक्कम मिळत नाही व पॉलिसी बंद होते.

रिटर्न ऑफ प्रीमिअम

या प्रकारच्या टर्म इन्शुरन्समध्ये रेगुलर टर्म इन्शुरन्सच्या लाभांसोबतच मॅच्युरिटी बेनिफिट देण्यात येते. संपूर्ण पॉलिसी टर्मदरम्यान पॉलिसीधारक जिवंत असेल तर पॉलिसीधारकाने भरलेले सर्व प्रीमियम जीएसटी वगळून 105% मॅच्युरिटी लाभ म्हणून देण्यात येते. परंतु या पॉलिसीचा प्रीमियम रेगुलर टर्म इन्शुरन्सच्या तुलनेत जास्त असतो. म्हणून रिटर्न ऑफ प्रीमियम व रेगुलर टर्न प्लॅनच्या प्रीमियम मधील फरकाची रक्कम इतर ठिकाणी गुंतवणूक केली तर रिटर्न ऑफ प्रीमियमच्या बेनिफिटपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते. म्हणून टर्म इन्शुरन्स घेताना रिटर्न ऑफ प्रीमियम व रेगुलर टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम तपासून पहावे. तसेच टर्म प्लॅन घेण्याचा मुख्य उद्देश लक्षात घ्यावा. रिटर्न ऑफ प्रीमियमच्या तुलनेत रेगुलर टर्म प्लॅन घेणे कधीही उत्तम आहे.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात. झिरो कॉस्ट टर्म प्लॅन हा असाच एक टर्म इन्शुरन्स आहे. यामध्ये पॉलिसीच्या ठराविक वर्षी पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेऊन पॉलिसीधारकाने भरलेले प्रीमियम परत मिळण्याची सुविधा असते. पॉलिसीधारकाला परत मिळणारी रक्कम ही प्रीमियम सोबत भरलेले जीएसटी वगळून असते. विमा कंपन्या हा लाभ देताना विशिष्ट अटी ठेवते. त्यामुळे हा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकांना जास्त कालावधीची पॉलिसी घ्यावी लागते. कालावधी वाढल्यामुळे सहाजिकच प्रीमियम सुद्धा वाढतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्सचा मुख्य उद्देश लक्षात घेता रेगुलर टर्म प्लॅन घेणे सोयीस्कर ठरते.

मेडिकल टेस्ट

विमा कंपन्याकडून टर्म इन्शुरन्स पॉलिसी देण्यापूर्वी व्यक्तीची मेडिकल टेस्ट केली जाते. मेडिकल टेस्ट दोन प्रकारे केली जाते. 

फिजिकल मेडिकल टेस्ट – 

पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला संबंधित विमा कंपनीशी संलग्नित दवाखान्यात प्रत्यक्ष बोलावून वैद्यकीय चाचणी केली जाते.

टेलीमेडिकल टेस्ट

फोनद्वारे आरोग्य स्थिती विषयी पूरक प्रश्न विचारले जातात.

टर्म इन्शुरन्स प्लॅन घेताना फिजिकल मेडिकल टेस्ट करण्याचा आग्रह धरावा. टेस्ट करताना व पॉलिसी घेताना आपल्या आरोग्यविषयक सर्व समस्या, आरोग्य स्थिती अचूक सांगावी. यामुळे क्लेम म्हणजेच दावा दाखल करताना अडचणी येत नाहीत. पॉलिसी घेताना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावीत. उदा. दारू पिणे, गुटखा, खर्रा खाणे, सिगारेट पिणे इत्यादी कोणत्याही गोष्टी लपवू नयेत.

प्रीमियम पेमेंट टर्म

प्रीमियम पेमेंट टर्म म्हणजेच पॉलिसीचे हप्ते भरण्याचा कालावधी. प्रीमियम पेमेंट टर्म व पॉलिसी टर्म या दोन वेगळ्या बाबी आहेत. प्रीमियम पेमेंट टर्म हा पॉलिसी टर्मइतकाच किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो. म्हणजेच एखादी पॉलिसी 35 वर्षेपर्यंत कव्हर देत असेल तर पॉलिसीधारक संपूर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत म्हणजेच 35 वर्षे पर्यंत हप्ते भरू शकतो किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी प्रीमियम भरू शकतो

प्रीमिअम पेमेंट टर्मचे तीन पर्याय आहेत.

सिंगल पे

टर्म प्लॅनचा प्रीमियम एकदाच एकरकमी भरून संपूर्ण पॉलिसी टर्मपर्यंत इन्शुरन्स कव्हरेज मिळते.

लिमिटेड पे

यामध्ये पॉलिसीधारकाला सुरुवातीचे 5, 7 किंवा 10 वर्षे प्रीमियम भरून संपूर्ण पॉलिसी टर्मचे कव्हरेज मिळू शकते.

रेगुलर पे 

यामध्ये पॉलिसीधारक संपूर्ण पॉलिसी टर्मपर्यंत प्रीमियम भरत असतो. यामध्ये पॉलिसी धारकाला मासिक, तिमाही, अर्धवार्षिक आणि वार्षिक हप्ते भरण्याची सोय उपलब्ध असते. 

       पॉलिसीधारक पैशांच्या उपलब्धतेनुसार वरीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो.

प्रीमियम वर परिणाम करणाऱ्या बाबी

वय

वयानुसार प्रीमियम वाढतो म्हणजेच 35 वर्षे वयाच्या व्यक्तीला 25 वर्षे वयाच्या व्यक्ती पेक्षा जास्त प्रीमियम द्यावा लागतो. एकदा घेतलेल्या पॉलिसीचा प्रीमियम मात्र संपूर्ण पॉलिसी टर्मसाठी कायम राहतो. म्हणून कमी वयात टर्म इन्शुरन्स घेणे फायदेशीर असते. आज जर तुम्ही 1200 रुपये प्रीमियम देत असाल तर दहा वर्षानंतरही प्रीमियम 1200 रुपयेच राहील. परंतु आज जे 1200 रुपयेचे मूल्य आहे, ते दहा वर्षानंतर कमी होणार आहे. म्हणून कमीत कमी वयात टर्म इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरते.

आरोग्य सवयी ( Health Habits )

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन जसे गुटखा, बीडी, सिगारेट तसेच अल्कोहोलयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला प्रीमियम जास्त द्यावा लागतो. टर्म इन्शुरन्स घेताना या बाबींची माहिती अचूक देणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो.

इन्शुरन्स कव्हरेज (Insurance Coverage )

टर्म पॉलिसीच्या इन्शुरन्स कव्हरेज रकमेनुसार प्रीमियम ठरत असतो. इन्शुरन्स कव्हर वाढवले तर प्रीमियम सुद्धा वाढतो, परंतु कमी प्रीमियममुळे कमी रकमेचे इन्शुरन्स कव्हर घेणे भविष्याच्या दृष्टीने हिताचे नाही.

पॉलिसी टर्म (Policy Term )

पॉलिसी टर्म जितका जास्त असेल तितका प्रीमियम वाढत जातो. वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंतचा टर्म इन्शुरन्स प्लॅन उत्तम मानला जातो.

लिंग ( Gender )

काही विमा कंपन्या स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना जास्त जोखमीचे समजतात. त्यामुळे पुरुषांना जास्त प्रीमियम द्यावा लागतो तर स्त्रियांना कमी प्रीमियम आकारतात.

ॲड ऑन रायडर्स (Add On Riders )

टर्म इन्शुरन्स घेताना आपण निवडलेल्या ॲड ऑन रायडर्समुळे प्रीमियममध्ये वाढ होते. आपल्या आवश्यकतेनुसार आपण रायडर्स निवडू शकतो. काही विमा कंपन्या टर्मिनल इलनेस बेनिफिट, वेव्हर ऑफ प्रीमियम बेनिफिट यासारखे ॲड ऑन रायडर्स टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या मूळ प्रीमियम मध्ये देतात, अतिरिक्त प्रीमियम आकारत नाही.

पे आउट पर्याय (Payout Options )

टर्म इन्शुरन्समध्ये इतर जीवन विमासारखा परिपक्वता लाभ – मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. केवळ पॉलिसी कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, ज्या रकमेची पॉलिसी घेतली होती ती रक्कम – कव्हरेज अमाऊंट वारसदारांना दिली जाते. विमा कंपन्यातर्फे हे मृत्यू लाभ चार प्रकारे देण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

एकरकमी पूर्ण रक्कम ( Lumpsum )

टर्म इन्शुरन्स प्लॅन एक करोड रुपयाचा असेल तर मृत्यूलाभ म्हणून एक करोड रुपये एकरकमी एकदाच दिले जाते.

मासिक उत्पन्न ( Monthly Income )

टर्म इन्शुरन्स पॉलिसी एक करोड रुपयाची असेल तर एक करोड रुपये पुढील 10 ते 15 वर्षे दरमहा विभागून दिले जातात.

वाढीव उत्पन्न ( Increasing Income )

टर्म इन्शुरन्स पॉलिसी एक करोड रुपयाची असेल तर मृत्यूलाभ देताना दरवर्षी विशिष्ट रकमेची वाढ केल्या जाते.

एक रकमी + मासिक उत्पन्न ( Lumpsum + Monthly Income)

टर्म इन्शुरन्स पॉलिसी एक करोड रुपयाची असेल तर काही ठराविक रक्कम एकदाच दिली जाते व उरलेली रक्कम ठराविक वर्षे विभागून दिली जाते.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना वरीलपैकी पेआउट पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य पॉलिसीधारकाला असते. परंतु Lumpsum म्हणजेच एकरकमी एकदाच रक्कम घेणे कधीही फायदेशीर ठरते. कारण एकरकमी मिळालेली रक्कम आपण इतर गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवून त्यावर पुन्हा अधिक नफा मिळवू शकतो.

पॉलिसीची वैशिष्ट्ये ( Policy Features )

आतापर्यंतच्या लेखातून आपल्याला टर्म इन्शुरन्सचे विविध फायदे लक्षात आले असेलच. कोणतीही पॉलिसी घेताना विमा कंपन्या काही अटी व शर्ती ठेवत असतात. या अटी व शर्तींचे काळजीपूर्वक वाचन करून त्या जाणून घेणे आवश्यक असते. टर्म इन्शुरन्स पॉलिसीची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

फ्री लुक पिरेड (Free Look Period)

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर पॉलिसीच्या अटी व शर्ती तुम्हाला मान्य नसेल तर पॉलिसी सुरू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्ही पॉलिसी रद्द करू शकता. या 30 दिवसाच्या कालावधीला फ्री लुक पिरेड म्हणतात.

ग्रेस पिरेड – वाढीव कालावधी ( Grace Period)

तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम दरमहा म्हणजेच मासिक भरत असाल तर एखादेवेळी प्रीमियम न भरल्यास 15 दिवसांचा वाढीव कालावधी ( ग्रेस पिरेड ) प्रीमियम भरण्यासाठी दिला जातो तर मासिक हप्त्या व्यतिरिक्त इतर पद्धतीने प्रीमियम भरत असाल तर 30 दिवसांचा वाढीव कालावधी ( ग्रेस पिरेड ) दिला जातो. ग्रेस पिरेडमध्ये कोणताही दंड आकारला जात नाही. या कालावधीत पॉलिसी चालू आहे असे समजण्यात येते. ग्रेस पिरेडमध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास कंपनी द्वारे मृत्यूलाभ देण्यात येते. ग्रेस पिरेडदरम्यान प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद होते व ग्रेस कालावधीनंतर पॉलिसीधारकांना कोणतेही इन्शुरन्स कव्हर लागू राहत नाही. म्हणून इन्शुरन्स पॉलिसी अखंडपणे चालू राहण्यासाठी नेहमी हप्ते ऑटो डेबिट पद्धतीने सुरू ठेवावे.

टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?How to buy term insurance in 2023? Where to buy term insurance in 2024?

विविध कंपन्यांचे टर्म प्लॅन व त्यांचे प्रीमियम तपासण्यासाठी त्या त्या कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन कोटेशन पहावे. पॉलिसीबाजार सारख्या वेबसाईटवर विविध कंपन्यांचे टर्म प्लॅन एकाच पानावर सहज उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांच्या टर्म प्लॅनचा तुलनात्मक अभ्यास सुद्धा करता येतो. योग्य टर्म प्लॅनची निवड करण्यासाठी व टर्म इन्शुरन्स पॉलिसी अत्यंत माफक प्रीमियममध्ये घेण्यासाठी आपल्याला मदत हवी असल्यास आमच्या 9579929375 या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज किंवा संपर्क करू शकता.

निष्कर्ष

       आपल्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुमच्याकडे जीवन विमा असणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या कुटुंबियांना अत्यंत कमी दरात उच्च आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करणारा जीवन विम्याचा परवडणारा प्रकार म्हणजेच टर्म इन्शुरन्स होय. कमी वयात पॉलिसी घेतल्यास प्रीमियम कमी द्यावा लागतो. टर्म इन्शुरन्सचा आदर्श कालावधी वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंतचा कालावधी होय. टर्म इन्शुरन्सची आदर्श कवरेज रक्कम तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीसपट असावी. पॉलिसी घेताना आपल्या आरोग्यविषयक सवयींची अचूक माहिती द्यावी. पॉलिसी घेताना विविध विमा कंपन्यांच्या प्लॅनचा तुलनात्मक अभ्यास करावा. पॉलिसीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक समजून घ्याव्या. पॉलिसीचे हप्ते चुकू नये यासाठी पॉलिसीचा प्रीमियम ऑटो डेबिट पद्धतीने भरावा. 

          चला तर मग, अजूनही वेळ गेलेली नाही. आजच आपला टर्म इन्शुरन्स प्लॅन काढुया आणि आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करूया.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

टर्म इन्शुरन्स प्रीमियम स्थिर आहे का?

होय, एकदा टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर संपुर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत प्रिमिअम स्थिर राहते.

टर्म इन्शुरन्स पॉलिसीमधून मला माझे पैसे परत मिळू शकतात का?

संपुर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत तुम्ही जिवंत राहिला तर रेगुलर टर्म इन्शुरन्ससाठी भरलेले हप्ते परत मिळत नाही.

मी टर्म इन्शुरन्स घ्यावा का?

तुमच्यापश्चात तुमच्या कुटुंबीयांचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहावे असे वाटत असेल तर तुम्ही टर्म इन्शुरन्स अवश्य घ्यावा.

एखाद्याने टर्म इन्शुरन्स केव्हा खरेदी करावा?

शक्य तितक्या कमी वयात टर्म इन्शुरन्स खरेदी करावा, कारण जसजसे वय वाढत जाते तसतसे टर्म इन्शुरन्सचा हप्ता वाढत जातो.

टर्म इन्शुरन्ससाठी आम्हाला किती वर्षे हप्ते भरावे लागतील?

तुम्ही टर्म इन्शुरन्सचे हप्ते एकाच वेळी एकरकमी किंवा मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच 5/7/10 वर्षे किंवा संपुर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत भरू शकता.

मला एका वेळी 2 टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकतात का?

होय, महागाई दरानुसार काही वर्षानंतर टर्म इन्शुरन्सचे कव्हर अपुरे आहे असे वाटल्यास तुम्ही दुसरी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.

मला टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी मदत कुठे मिळेल?

तुम्हाला टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी मदत हवी असल्यास, टर्म इन्शुरन्स चे कोटेशन पाहायचे असल्यास आमच्या 9579929375 या नंबर वर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधू शकता.

1 thought on “How To Buy Term Insurance in 2024 | टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top